Saturday 2 April 2016

"एका शेवटाची सुरूवात "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

मूलींचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून परत येताना रस्त्यात आंब्याचे झाड दिसले.
" बाबा कैरी हवी " या बालहट्टात सामील होऊन दगड भिरकावून कैर्‍या पाडल्या व  "वज्रेश्वरी" गावातील  माझ्या खोडकर दिवसांची आठवण झाली.

"बाबा  ह्या झाडाला आपण कधी पाणी दिले नाही की याची निगा घेतली  नाही  की  काळजी घेतली नाही; या ऊलट दगड मारून दूखवलेच त्याला; तरीही त्याने न रागावता आपल्याला कैर्‍या दिल्या."
"मग ज्या ' मनूष्यप्राण्याने ' आपल्या मूलाबाळांवर प्रेम केले त्यांच्या साठी "आयूष्य "वेचले त्यांच्या वाट्याला 'वृद्धाश्रम' का हो ? "

तिच्या प्रश्नातच  मला  ऊत्तर दिसले. "मनूष्य" फार कमी काळ "मनूष्या"सारखा वागतो, आणि  जास्त वेळ " प्राण्या"सारखाच असतो  !  पंखात व पंजात बळ  येण्या पूरतीच प्राण्यांमधे कुटुंब  व्यवस्था  असते.  म्हणूनच  "मनूष्यप्राणी"  हेच  संबोधन  सूचक  होते .

"बस झालं  रे  परमेश्वरा,  ने  आता  !"
"नाही  सोसवत रे आता !! बोलव  रे,  लवकर !!"

अशा अर्थाची  वाक्य दिवसात कोणाच्या ना कोणाच्या तोंडून आपल्या कानी पडतात. तरीही हा क्षणिक वैताग, त्रास, बाजूला ठेवून प्रत्येक जण जगत असतो. ....तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टी जगण्यास प्रवृत्त करतात. ? ? ?

कर्तव्य,  जबाबदारी,  स्वप्न, नातीगोती, कुटुंब, प्रेम या  प्रयोजनांचे स्वरूप  आयूष्याच्या  वेगवेगळ्या  टप्प्यांवर  बदलत  जाते.

पण  आयूष्याच्या  संध्याकाळी  तीव्र  जीवनेच्छेचे  ठोस  कारण नसले  तर  ही  संध्याकाळ फारच  तप्त  होते  , जीवाची  काहीली  करते .

आपण  निरूपयोगी ; कुटुंबावर  भार ; घरात  अडचण  म्हणून  तर  राहणार  नाही  ना  ???
हा  विचार  अस्वस्थ  करतो.

"गात्र" शिथिल  होत  जातात  अन  "त्रागा" वाढत  जातो  .

'आम'च्या  वेळी  असं नव्हतं  !!
'आम'च्या ईथे  नव्हते  हो  चालत  असलं !
'आम'च्या  कुटुंबात  नाही हो  ह्या  पद्धती  !
'आम'च्यात  नाही असे  काही  !!

हा " आमवात  " बळावत  जातो  व जनरेशन  गॅप  ची  " रूजवात " होते.

तारूण्याच्या ऐन  उमेदीत  ज्या  स्वप्नांच्या मागे  जीवाचे  रान  केले, करियर  च्या  मागे बेदरकारपणे  बेफाम  होऊन  धावताना प्रसंगी  मूल्यसंस्कार तूडवले गेले त्या  स्वप्नांचे  मोल आता  कवडीमोल   झालेले  पाहून  आता विषाद,  खेद,  खंत  ,उपेक्षा  याखेरीज  हाती काही लागत नाही.
नको  नको  म्हणत  टाळताना  नकळतपणे  समोर  ऊभा  ठाकलेला  " वानप्रस्थाश्रम " मानसिक, भावनिक, शारीरिक, व आर्थिक  रिकामपण  घेवून  येतो.
कर्तव्य , लोकलज्जा, प्रापर्टी   किंवा  प्रेमापोटी  काही  जण  जेष्ठांची जबाबदारी  घेतातही पण  ती  जबाबदारी  नूसतीच घेवून  चालत  नाही  ती  निभावणं  ही  गरजेचे  असते.

कृपया  जेष्ठांच्या मदतीची  याचना  करण्याची  वाट  पाहू  नका , त्यात  त्यांना  मेल्याहून मेल्यासारखे होईल. ....न मागता........हात  न  पसरताही त्यांचा  हात  हाती  घ्या. पैशाची  नव्हे  तर  सहवासाची  , सहप्रवासाची  मदत  करा. ऊत्तम  श्रोता  व्हा  ! ! त्यांना  बोलण्याची  संधी  द्या. जगण्यात  जीवन  येईल त्यांच्या.

हे  करत  असताना  एक  महत्त्वाची  गोष्ट  करा ते  म्हणजे  आज  तूम्हाला  वयोवृद्धा  कडून  जी  अपेक्षा  आहे, त्यांच्या  ज्या  गोष्टीचा  त्रास  होतोस  ,ज्या  गोष्टीची  अडचण  होतेय  अस  वाटत. ..ती  मात्र  लक्षात ठेवा. ......कारण  तूम्हीही  वानप्रस्थाश्रमात
जाणार  आहात  निदान  पूढील  गृहस्थाश्रमींना  तरी  फायदा  होऊल त्याचा .
कारण  अंतिम  आनंदयात्रेनंतर जर  ,"बर  झालं  सूटले एकदाचे, "हे  हळहळणारे शब्द  जगलेल्या  आयूष्याचा  पराभव  करतात.

"काय  हे  बाबा,  किती कठीण  लिहिले आहे , मला कळेल  असे सोपे  सांगा  ना  जरा "

माझ्या  सातवीत  असणार्‍या  ऋचा ची  तक्रार  वजा  सूचना.

ठीक  तर  एक  गोष्ट  ऐक
आटपाट  नगरात  एक  विचित्र  कायदा  होता  कोणताही  राजा  फक्त  एक  तप  ( बारा  वर्षे ) राज्य  करेल त्या  मूदतीनंतर त्यांची  रवानगी  नगरीच्या  नदीच्या  पल्याड असलेल्या  निर्जन,  भयाण  हिंस्र  श्वापदे  असलेल्या  अरण्यात  केली  जाईल.

मूदत पूर्ण  होताच  आजपर्यंत  प्रत्येक  राजाला  जबरदस्तीने  नावेत  बसून  न्यावे  लागे. ....ते  ओरडायचे  रडायचे  विनवण्या  करायचे  पण  प्रजा  नियमाला  बांधिल होती.

पण  आज  मात्र  विलक्षण  घङत  होते  राज्यकारभाराची  मूदत पूर्ण  करून  राजा योगेंद्र  अतिशय  आनंदात , प्रसन्न चित्ताने,  स्वखुशीने  नावेतून पलिकडे  निघाला  होता. प्रजा  आश्चर्यचकित  होऊन  हा  निरोप  समारंभ  पहात  होती.

नावेच्या  नावाड्यासाठीही  हे  सर्वस्वी  नवीन  होते.
न  राहवून  तो  राजाला  म्हणाला ,

," राजन  आजपर्यंत  तूमच्या  ईतक्या  समाधानाने  राजीखूशीने या  शेवटच्या  प्रवासाला  कोणीच  निघाले  नाही. "
"आपल्या  शांत  असण्याचे  रहस्य  काय  ? ??" "आपणास  त्या  निबिड  , भयाण  जंगलाची  भीती  नाही  का  वाटत  ? "

राजा  उत्तरला, " अजिबात  भीती  नाही  वाटत  मला. गादीवर  बसतानाच मला  माहीत  होते  की  एक  दिवस  मला  त्या  भयाण  अरण्यात  जावेच  लागणार  आहे.

आदर्श राज्यकारभार करताना  मी  एक मात्र  केले  पलिकडच्या  अरण्यावर  पण  लक्ष दिले .माझ्या  कालावधीत  मी  तेथे  नंदनवन  फूलवले .आता त्या  निर्जन  जंगलाची  मला  भीती  नाही  उरली. मी  कृतार्थ  आहे.

कारण  या  "शेवटाची"  मी  कधीच  "सूरूवात"  केली  होती .

  मंडळी आता  तूम्ही  तरूण  आहात,  निवृत्तीच्या अरण्याचा विचारच  काय  स्वप्न ही   कधी  पडत  नसेल . परंतू  हीच  योग्य  वेळ आहे  पलिकडे  आपल्यासाठी  नंदनवन  फूलवून ठेवण्यासाठी.

आजपासून  वानप्रस्थाश्रम  चे  नियोजन  करा

कोणाकडून  अपेक्षा  ठेवाल  तर  अपेक्षाभंगाच्या  दूखाची तयारीही  ठेवा .

महीन्याच्या  मिळकती मधील  एक  हिस्सा  बाजूला  ठेवा. समाजऋण फेडण्यासाठी.

पिढी दर पिढी वेगवान  होत  जाणार्या  आयूष्याच्या  गाडी  बरोबर  Adjust  व्हायला  शिका. किंवा Add  just  करा .

दिलेले काढू नका , केलेले  आठवू  नका.

असे केले  तर  "निवृत्ती " होईल  "प्रवृत्ती " व  ठरेल  "आवृत्ती " नित्य  नव्या  जीवनाची.

तर  मग  आजच  करूया  एका  शेवटाची  सूरूवात
मी  केलीय  तूमचं  काय  ?

योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे