Saturday, 2 April 2016

"एका शेवटाची सुरूवात "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

मूलींचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून परत येताना रस्त्यात आंब्याचे झाड दिसले.
" बाबा कैरी हवी " या बालहट्टात सामील होऊन दगड भिरकावून कैर्‍या पाडल्या व  "वज्रेश्वरी" गावातील  माझ्या खोडकर दिवसांची आठवण झाली.

"बाबा  ह्या झाडाला आपण कधी पाणी दिले नाही की याची निगा घेतली  नाही  की  काळजी घेतली नाही; या ऊलट दगड मारून दूखवलेच त्याला; तरीही त्याने न रागावता आपल्याला कैर्‍या दिल्या."
"मग ज्या ' मनूष्यप्राण्याने ' आपल्या मूलाबाळांवर प्रेम केले त्यांच्या साठी "आयूष्य "वेचले त्यांच्या वाट्याला 'वृद्धाश्रम' का हो ? "

तिच्या प्रश्नातच  मला  ऊत्तर दिसले. "मनूष्य" फार कमी काळ "मनूष्या"सारखा वागतो, आणि  जास्त वेळ " प्राण्या"सारखाच असतो  !  पंखात व पंजात बळ  येण्या पूरतीच प्राण्यांमधे कुटुंब  व्यवस्था  असते.  म्हणूनच  "मनूष्यप्राणी"  हेच  संबोधन  सूचक  होते .

"बस झालं  रे  परमेश्वरा,  ने  आता  !"
"नाही  सोसवत रे आता !! बोलव  रे,  लवकर !!"

अशा अर्थाची  वाक्य दिवसात कोणाच्या ना कोणाच्या तोंडून आपल्या कानी पडतात. तरीही हा क्षणिक वैताग, त्रास, बाजूला ठेवून प्रत्येक जण जगत असतो. ....तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टी जगण्यास प्रवृत्त करतात. ? ? ?

कर्तव्य,  जबाबदारी,  स्वप्न, नातीगोती, कुटुंब, प्रेम या  प्रयोजनांचे स्वरूप  आयूष्याच्या  वेगवेगळ्या  टप्प्यांवर  बदलत  जाते.

पण  आयूष्याच्या  संध्याकाळी  तीव्र  जीवनेच्छेचे  ठोस  कारण नसले  तर  ही  संध्याकाळ फारच  तप्त  होते  , जीवाची  काहीली  करते .

आपण  निरूपयोगी ; कुटुंबावर  भार ; घरात  अडचण  म्हणून  तर  राहणार  नाही  ना  ???
हा  विचार  अस्वस्थ  करतो.

"गात्र" शिथिल  होत  जातात  अन  "त्रागा" वाढत  जातो  .

'आम'च्या  वेळी  असं नव्हतं  !!
'आम'च्या ईथे  नव्हते  हो  चालत  असलं !
'आम'च्या  कुटुंबात  नाही हो  ह्या  पद्धती  !
'आम'च्यात  नाही असे  काही  !!

हा " आमवात  " बळावत  जातो  व जनरेशन  गॅप  ची  " रूजवात " होते.

तारूण्याच्या ऐन  उमेदीत  ज्या  स्वप्नांच्या मागे  जीवाचे  रान  केले, करियर  च्या  मागे बेदरकारपणे  बेफाम  होऊन  धावताना प्रसंगी  मूल्यसंस्कार तूडवले गेले त्या  स्वप्नांचे  मोल आता  कवडीमोल   झालेले  पाहून  आता विषाद,  खेद,  खंत  ,उपेक्षा  याखेरीज  हाती काही लागत नाही.
नको  नको  म्हणत  टाळताना  नकळतपणे  समोर  ऊभा  ठाकलेला  " वानप्रस्थाश्रम " मानसिक, भावनिक, शारीरिक, व आर्थिक  रिकामपण  घेवून  येतो.
कर्तव्य , लोकलज्जा, प्रापर्टी   किंवा  प्रेमापोटी  काही  जण  जेष्ठांची जबाबदारी  घेतातही पण  ती  जबाबदारी  नूसतीच घेवून  चालत  नाही  ती  निभावणं  ही  गरजेचे  असते.

कृपया  जेष्ठांच्या मदतीची  याचना  करण्याची  वाट  पाहू  नका , त्यात  त्यांना  मेल्याहून मेल्यासारखे होईल. ....न मागता........हात  न  पसरताही त्यांचा  हात  हाती  घ्या. पैशाची  नव्हे  तर  सहवासाची  , सहप्रवासाची  मदत  करा. ऊत्तम  श्रोता  व्हा  ! ! त्यांना  बोलण्याची  संधी  द्या. जगण्यात  जीवन  येईल त्यांच्या.

हे  करत  असताना  एक  महत्त्वाची  गोष्ट  करा ते  म्हणजे  आज  तूम्हाला  वयोवृद्धा  कडून  जी  अपेक्षा  आहे, त्यांच्या  ज्या  गोष्टीचा  त्रास  होतोस  ,ज्या  गोष्टीची  अडचण  होतेय  अस  वाटत. ..ती  मात्र  लक्षात ठेवा. ......कारण  तूम्हीही  वानप्रस्थाश्रमात
जाणार  आहात  निदान  पूढील  गृहस्थाश्रमींना  तरी  फायदा  होऊल त्याचा .
कारण  अंतिम  आनंदयात्रेनंतर जर  ,"बर  झालं  सूटले एकदाचे, "हे  हळहळणारे शब्द  जगलेल्या  आयूष्याचा  पराभव  करतात.

"काय  हे  बाबा,  किती कठीण  लिहिले आहे , मला कळेल  असे सोपे  सांगा  ना  जरा "

माझ्या  सातवीत  असणार्‍या  ऋचा ची  तक्रार  वजा  सूचना.

ठीक  तर  एक  गोष्ट  ऐक
आटपाट  नगरात  एक  विचित्र  कायदा  होता  कोणताही  राजा  फक्त  एक  तप  ( बारा  वर्षे ) राज्य  करेल त्या  मूदतीनंतर त्यांची  रवानगी  नगरीच्या  नदीच्या  पल्याड असलेल्या  निर्जन,  भयाण  हिंस्र  श्वापदे  असलेल्या  अरण्यात  केली  जाईल.

मूदत पूर्ण  होताच  आजपर्यंत  प्रत्येक  राजाला  जबरदस्तीने  नावेत  बसून  न्यावे  लागे. ....ते  ओरडायचे  रडायचे  विनवण्या  करायचे  पण  प्रजा  नियमाला  बांधिल होती.

पण  आज  मात्र  विलक्षण  घङत  होते  राज्यकारभाराची  मूदत पूर्ण  करून  राजा योगेंद्र  अतिशय  आनंदात , प्रसन्न चित्ताने,  स्वखुशीने  नावेतून पलिकडे  निघाला  होता. प्रजा  आश्चर्यचकित  होऊन  हा  निरोप  समारंभ  पहात  होती.

नावेच्या  नावाड्यासाठीही  हे  सर्वस्वी  नवीन  होते.
न  राहवून  तो  राजाला  म्हणाला ,

," राजन  आजपर्यंत  तूमच्या  ईतक्या  समाधानाने  राजीखूशीने या  शेवटच्या  प्रवासाला  कोणीच  निघाले  नाही. "
"आपल्या  शांत  असण्याचे  रहस्य  काय  ? ??" "आपणास  त्या  निबिड  , भयाण  जंगलाची  भीती  नाही  का  वाटत  ? "

राजा  उत्तरला, " अजिबात  भीती  नाही  वाटत  मला. गादीवर  बसतानाच मला  माहीत  होते  की  एक  दिवस  मला  त्या  भयाण  अरण्यात  जावेच  लागणार  आहे.

आदर्श राज्यकारभार करताना  मी  एक मात्र  केले  पलिकडच्या  अरण्यावर  पण  लक्ष दिले .माझ्या  कालावधीत  मी  तेथे  नंदनवन  फूलवले .आता त्या  निर्जन  जंगलाची  मला  भीती  नाही  उरली. मी  कृतार्थ  आहे.

कारण  या  "शेवटाची"  मी  कधीच  "सूरूवात"  केली  होती .

  मंडळी आता  तूम्ही  तरूण  आहात,  निवृत्तीच्या अरण्याचा विचारच  काय  स्वप्न ही   कधी  पडत  नसेल . परंतू  हीच  योग्य  वेळ आहे  पलिकडे  आपल्यासाठी  नंदनवन  फूलवून ठेवण्यासाठी.

आजपासून  वानप्रस्थाश्रम  चे  नियोजन  करा

कोणाकडून  अपेक्षा  ठेवाल  तर  अपेक्षाभंगाच्या  दूखाची तयारीही  ठेवा .

महीन्याच्या  मिळकती मधील  एक  हिस्सा  बाजूला  ठेवा. समाजऋण फेडण्यासाठी.

पिढी दर पिढी वेगवान  होत  जाणार्या  आयूष्याच्या  गाडी  बरोबर  Adjust  व्हायला  शिका. किंवा Add  just  करा .

दिलेले काढू नका , केलेले  आठवू  नका.

असे केले  तर  "निवृत्ती " होईल  "प्रवृत्ती " व  ठरेल  "आवृत्ती " नित्य  नव्या  जीवनाची.

तर  मग  आजच  करूया  एका  शेवटाची  सूरूवात
मी  केलीय  तूमचं  काय  ?

योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे




Tuesday, 22 March 2016

"राजगृहातील वनवास "


चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

               " राजगृहातील  वनवास  "

"बाबा रामायणातील  लक्ष्मणाच्या  पत्नी  चे  नाव  काय  हो  ?"

माझ्या  मूलगी  ऋचा च्या  या  प्रश्नाने  मी  गोंधळून गेलो .

"अग  ते  आपलं.....
  , हे  ....काय ....
...ते  म्हणजे". ........
.अग ..  ...तोंडावर  आहे........
पण. .येत. .. नाही  ...
"आपल  ...हे..."......." ते ......".

आणि  मला लक्षात  आलं.....
  की  हे  आपल्याला " आठवत "  नाही  किंवा  कधी  "लक्षातच  ठेवलेले  नाही, जाणीवपूर्वक!

राम -सीतेसह चौदा  वर्षे  वनवासात  सावली  बनून  राहणारा  सावत्र भाऊ  "लक्ष्मण " हा " आदर्श  बंधू, " "आदर्श  दीर " , व स्वतःच्या पत्नी  ला  चौदा  वर्षे  राजगृही  वनवासाहूनही खडतर  अशा  पतीवियोगात सोडणारा  म्हणून  "वैराग्याचा  पूतळा "  म्हणून  गौरवला जातो. ..
...
पण  त्याच  वेळी  कोणतीही  चूक  नसताना  चौदा वर्षे  पतीवियोगात  राजगृही  वनवासात  भोगणाऱ्या  त्याच्या  पत्नीची  दखल महर्षी  वाल्मिकी  नी  घेवू  नये. ...

तिच्या  व्याकूळ  मनोअवस्थेचे  , संतापाची  योग्य  ती  दखल.......योग्य ते   वर्णन  ही  करू  नये .......

चौदा वर्षे  पत्नी  पासून  दूर  राहून  जर  लक्ष्मण  वैराग्याची  मूर्ती,  आदर्श  बंधू. ...आणि  राम -सीतेसह  देवत्व  प्राप्त  करत  असेल. .तर
त्याच्या   पत्नी  ला    "त्यागाची  मूर्ती,"  "वैराग्य शिरोमणी ,"वंदनीय, " पूजनीय "म्हणुन  का मान्यता मिळू  नये. ..........का बरं  तिचे साध " नाव " सूद्धा  आम्हाला  पटकन  आठवू  नये. ..

प्रकाश  देणार्या  समईचे कौतुक  होते  पण  स्वतः  ला  जाळून  घेणारी  वात  खिजगणतीतही  नसते........

आपल्या  अवती  भोवती  कदाचित  अशा  वाती  असू  शकतील .......
आई. .पत्नी. .बहीण. ..वहीनी. ..अनेक  रूपात. ......

वाल्मिकी  नी  केलेली  चूक  आपण  का  करायची  ?

त्या  जळणार्या  वातीला फक्त  ईतकच म्हणून  बघा

   " कीती  करतेस  गं  तू  ?
   "थकत  कशी  नाहीस  ?
"लक्षच  देता नाही  आले  तूझ्याकडे !"

मी खात्रीने  सांगतो  असं   म्हटल्यावर
त्या  राजगृही  वनवासाहूनही  खडतर  अशा  दूःखात  कूढणार्या ""ऊर्मिले"" चे  डोळे  पाण्याने  भरून  येतील  व  सारा  वनवास सूफल  संपूर्ण  होईल. .

मग  म्हणणार  ना  आजच  !

🙏चिंतनिका जीवन एक " संघर्ष "    
योगेश जोशी 

9967766451
वज्रेश्वरी / ठाणे 

आवडल्यास  शेअर करा ।

Saturday, 12 March 2016

"घे भरारी "


चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌷

गरूडाचा एक  समूह  खाण्याच्या  शोधार्थ  उडत उडत एका  बेटावर  आला  .

ते  बेट  जणू  नंदनवनच होते.
 चहूकडे  खाण्यासाठी  बेडूक ,खेकडे ,मासे, साप,  व  अनेक  समूद्रीजीव होते.

 महत्त्वाचे म्हणजे  आजूबाजूला  त्या  गरूडांवर  हल्ला  करेल  अशा  कोणत्याही  जंगली  श्वापदाचे अस्तित्व  नव्हते.

अगदी  निश्चिंत  मनाने  कशाचीही  भीती  न  बाळगता  ते तेथे  राहू  शकत  होते.

समूहातील  तरूण  गरूड  तर  एकदम  ऊत्साहीत होते.

त्यातील  एक जण  म्हणाला
,"वाह  क्या बात है  !  आता  मी  ईथून कोठेही  जाणार  नाही,  अगदी  बसल्या बसल्या  मेजवानी  आहे  ईथे  ."

ईतर  गरूड  ही  त्याच्या  "हो"  ला  "हो" करत  आनंदात  मशगूल   होते. 

सर्वाचे  छान  आरामात  चालले  असताना  समूहातील  जेष्ठ  गरूड  मात्र  नाराज,व दुखी  होता.

एक  दिवस  त्याने  आपली  चिंता  व्यक्त केली,

"मित्रांनो,  आपण  एक  गरूड  आहोत,  ऊंच  गगन  भरारी घेणे  व अचूकपणे  सावजावर घट्ट  झडप  घालण्यासाठी आपण  ओळखले  जातो.

"" पण  जेव्हा  पासून  आपण  ईथे  आलोय,  गगन  भरारी  सोडाच आपल्या  पैकी  अनेक  जण  साधं  ऊडले सूद्धा  नाहीत  की  पंख  ही  फडफडविलेले  नाहीत.

"आरामदायी  मेजवानी  मूळे  आपण  शिकार  करणेच  विसरून  जाऊ , हे आपल्या  भविष्यासाठी  घातक  आहे. "

"म्हणून  मी हे  बेट  सोडण्याचा  निर्णय  घेत आहे, ज्यांना  माझ्यासोबत  यायचे  आहे  ते  येवू  शकतात. "

त्या  जेष्ठ  गरूडाचे बोलणे  ऐकून सगळे  हसायला  लागले.
कोणी त्याची  गणना  "मूर्खात"  तर  कोणी " वेडा" म्हणून  निर्भत्सना  केली.

बिचार्‍या   एकट्यानेच  ते बेट  सोडून  दूरच्या  जंगलात  जाण्यासाठी  गगन  भरारी  घेतली.

काही  काळ .....  , वर्ष  सरली................  .

तो  गरूड  म्हातारा  झाला .
 त्याला कळाले  की  आपण  फार  दिवसाचे  सोबती नाहीत.
त्याला  मनोमन  आपल्या  साथीदारांची  आठवण  झाली.

  वाटले  चला  एकदा  पाहून  येवू  सार्याना ....आणि  मग  मोठी  भरारी  घेवून  मजल  दरमजल  करत  तो  त्या बेटावर  पोहचला. ..........
....तेथील  दृश्य  फारच  भयानक  होते. ..अकल्पित  होते. .....

बहूतेक  गरूड  मारले  गेले होते. ....
जे  थोडे  वाचले  ते  जखमी  असहाय्य , अगतिकपणे  आर्त  विव्हळत  होते.

" हे काय  झाले  ?  "  जेष्ठ  गरूडाने विचारले

दूखाने विव्हळत  एक  जखमी  गरूड म्हणाला

"आम्हाला  क्षमा करा  !! आम्ही  तूमचा  सल्ला  गंभीरपणे  घेतला  नाही. "

"तूम्ही  गेल्यावर  काही  महीन्यात  या  बेटावर  नाव  घेवुन  काही  माणसे  आली  आणि काही शिकारी  कूत्रे ईथे  सोडून  गेली. "
"सूरूवातीला  कूत्रे  आमच्या  जवळ  आले  नाहीत  पण जेव्हा  त्यांना  समजले  आम्ही  ऊडू ही शकत  नाही  व पंज्याने हल्ला  ही  करू  शकत नाही त्यांनी  आमची  शिकार  करायला  सूरूवात  केली.

जवळपास  सारेच  नष्ट  झालेत..
  जे आमच्या सारखे  राहीलेत  जखमी, अभागी.....  मरणाची  वाट  पहातोय. ..."

  त्या जेष्ठ  गरूडा जवळ  त्यांच्याबद्दल वाईट  वाटण्याखेरीच काहीच  नव्हते ...हळहळत  त्याने   पून्हा  जंगलाकडे  भरारी घेतली.

मित्रांनो  अगदी  असेच  आपल्या  बाबतीतही  घडू  शकते.

जेव्हा  आपण  आपल्या  देणगी  मिळालेल्या  नैसर्गिक  शक्तींचा  ऊपयोग  करत  नाही,   तेव्हा  त्या  गमावून  बसतो.

मग  ती  शक्ती  मनाची  असेल  , मेंदूची  असेल  किंवा  स्नायूंची  असेल  न  वापरल्याने  त्यातील  तेज  ,ओज  कमी  होऊन  निस्तेज  होते.

अशाच  प्रकारे  अंगभूत  असणारी  कौशल्ये, कला  (skill ) यांना  वेळोवेळी  पैलू  पाडले (*polish ) नाहीत  तर  त्याची  क्रियाशक्ती कमी  होते

अतिशय  वेगाने  बदलत  असलेल्या  काळात  आम्ही  आमच्या  नोकरीत  कींवा  करीत  असलेल्या  व्यवसायात  ईतके  सूखासीन ,सूखेनैव, *(comfortable ) असतो  की  मग  कोणताही  नवा बदल  , नवे  ज्ञान,  नवीन  तंत्र , नवे  कौशल्य  आत्मसात  करण्याच्या  भानगडीत  आम्ही  पडत नाही .

आणि  मग  आम्ही  मागे  पडतो  ..........

कधी कधी  बाहेर  फेकले  जातो. .......

आणि  त्याचे खापर  नशीब वर  कींवा  Market Conditions वर  फोडून  रडत  बसतो .

मंडळी .. ..................

HMT घड्याळ,  ............

BUSH  /Crown  TV  ..............

Kelvinetor  Refrigerator ...... .......

Nokia  Handset. .............

HMV  Cassette. .... .....

हे सगळे कशातही गूणवत्तेत कमी नव्हते ........

पण  काळाच्या  जोडीने  बदलले  नाहीत  आणि  मोठी  किंमत  चूकवली ........बाहेर  फेकले गेले. ...

"समय  के  साथ  बदलो , नही तो  समय  आपको  बदल  देगा "
खरच  अस  नको  व्हायला .......

"आपलं ज्ञान, "
 आपल्या  क्षमता, 
आपली  कौशल्ये, 
आपली  तंत्रे  
येणार्या  व बदलत्या  वेळेनुसार  अद्ययावत  करू  या. .....

.त्यांना  धार  आणून  तेजस्वी  करूयात ........
सातत्याने फूकंर मारून  निखार्यावरील  राख  ऊडवून अग्नी  प्रज्वलित  ठेवूया. ...........

यासाठी  "  ना  वयाचे  बंधन  ना  वेळेचे. ..."....

ज्या  साठी  आपण  ओळखले  जात होतो  तीच  ओळख  कायम  ठेवू  या.....  त्या  साठी  प्रयत्नशील  असू  द्या. .

अस  झाल  की  मग  संकटांचा  किंवा  आव्हानांचा  कितीही  मोठा डोंगर  ऊभा  ठाकला  तरी  जिद्दीच्या  पंखांनी  आपण  उंच  उंच  गगन  भरारी नक्कीच  घेवू  शकतो.


             "मंझिल  ऊन्ही को  मिलती  है
            जिनके  सपनो  में  जान  होती है ।
             सिर्फ़  पंखों  से  कूछ  नही  होता
              ऊडान हौसलोंसे  होती  हैं  ।


माझी लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

नम्र विनंती : 
आवडल्यास  हा  ब्लॉग  तूमच्या  किमान  चांगल्या  मित्र/ मैत्रीणी ला  शेअर  करा ।

Friday, 4 March 2016

मागे काही राहीलयं का?

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
योगेश जोशी वज्रेश्वरी / ठाणे

        "मागे काही राहीलं तर  नाही  ना   ? "

"अरे  सगळे  सामान  घेतल  का  ?"  "बस  मधे  कोणाच काही  राहील तर  नाही  ना  ?"

"हो .......सर  ,सगळ  घेतल , न  विसरता  !!
सहलीवरून  ऊतरलेली मूल  एकसूरात  ओरडली

"छान , पण  जोशी सर  ,  एकदा  बस  मध्ये  जाऊन  बघता  का   ,"काही मागे राहीलयं  का ते  ? "म्हणजे बस  परत  गेल्यावर  नंतर  धावपळ  नको  !  कस

मूख्याध्यापकांनी सूचना  वजा  विनंती  केली.

"होय  येतो  पाहून,  "
अस  म्हणत  सर  बस  मधे  गेले

एका नजरेत  बस  पाहील्यावर  लक्षात  आलं  सगळ्यांचच  खूप  काही  राहील  आहे  मागे.

वेफर्स ,कूरकूरे,  चाॅकलेट  यांचे  रॅपर्स,  फ्रूटी  , प्लास्टिक  बाॅटल्स.........आता  मात्र  ते  कोणाचच नव्हते  ...

जोपर्यंत  ह्या  भरलेल्या  होत्या  तोपर्यंतच  या  सर्व  " माझ्या " या  सदरात  मोडत  होत्या. .....
आणि  आता  मात्र  कोणाच्याच  नव्हत्या.

.............जमेल  तेव्हढे  एका पिशवीत भरून  सर  खाली  ऊतरले.

"काही  राहील  होत  का  मागे  ?"

या  मूख्याध्यापकांच्या प्रश्नावर   हसत हसत नकारार्थी  मान  हलवत  जमलेल्या  पालकांकडे  गेले.

पण  मन  मात्र  .............

"मागे  काही  राहीलयं  तर  नाही ना  ?"

याच  प्रश्नाभोवती घूटमळत राहीले. ..आयूष्याच्या  प्रत्येक  टप्प्यावर  हा  प्रश्न  निरनिराळ्या  रूपात  समोर  ऊभा ठाकला  ईतके  मोठे  प्रतल या  प्रश्नाचे
 
बालपण  सरताना अनेक  गोष्टी  मागे  राहील्या  काही  खेळ  विकत  घ्यायचे तर  काही  खेळायचे  राहीले. ............

तारूण्याच्या  उंबरठ्यावर  मनापासून  आवडलेल्या व्यक्ती ला अंतरीचे  गूज सांगायचे  राहून  जाते.....

.......व्यवहारी  आयूष्य  पूढेच  सरकत  असल  तरी मन  मात्र  सदैव  मागे  मागे  घूटमळत असत

..आईसोबत  चालणाऱ्या  लहान  बाळा सारखे. .........आई  पूढे  पूढे  जात  असते, पण  तो  रस्तावरील  मांजरीची पिल्ले, रंगीत  काचा,  दगड,  काठ्या  यातच  मागे  मागे  घूटमळत  असतो. ...अगदी  तस्सेच. ....

.                       ● सूचना ●

● पैसे, पाकीट, किल्ली, पास, रूमाल, घेतलात काय?
● लाईट गॅस पंखा नळ बंद केलेत का?
● घाई नको, आपल काही मागे राहीलं तर नाही ना  ?

अशा प्रकारचा  एक बोर्ड  सोसायटीच्या जिन्यात  वाचला.
मनात  सहज  विचार  आला

, "तीन  महीन्याच्या तान्ह्या बाळाला घरात ठेवून कामावर निघालेल्या मातेला हे वाचून काय वाटेल  ?

व्यवहारी जगातील  "सर्व काही " मिळवण्याच्या अट्टाहासापायी काळजातील " सर्व काही "  मागे  ठेवूनच  निघते  ती. ... 
सांगा  कसं  म्हणावं  तिने  "सगळे  घेतलय"  म्हणून. ........

लग्नमंडपात मुली ची पाठवणी  होताना  आईच्या  डोळ्यात  आभाळ  सांडून  ती  रिती  होते.
सगळी  देणी  भागवून  बाप  निवांत  होतो न  होतो  तोच 

एखादी  आत्या  त्याला  म्हणते, "

" दादा हाॅल  सोडायच्या  आधी , एकवार  आत  खोलीत  जाऊन  बघून  ये  बर  ", "काही  मागे राहीलयं का ते?

रिकाम्या  खूर्च्या,  पसरलेल्या  अक्षदा,  ओलांडून  तो  वधूपक्षाच्या  खोलीत  येतो. .......

मूली ने  गौरीहार  पूजला तेथे  आता फक्त फूले  मलूल  पडलेली  दिसतात. ...

.व्याकूळतेने  मनात  म्हणतो  ," सगळच  तर  मागे  राहीलयं." ....... ...

पंचवीस  वर्षे  जे  "नाव " घेवून  ....
...त्या " नावाने " हाका  मारत  तिच्या  मागे  मागे  पळत  होता  , 
ते  तिचे  'नावही '  व  तिच्या " नावापुढे"  ज्या  अभिमानाने   लावत  असलेले  "त्याचे " नावही   

हातावर ऊदक  सोडताच क्षणार्धात  तिथेच  त्या अक्षतापूष्पा  सोबत " निर्माल्य " झालेले  दिसल्याने  एकटाच मनातल्या मनात  भरभरून  कोसळतो. ...........

"अरे  आलास  का पाहून  ? "
आपल  मागे  काही  राहीलं तर नाही ना  ?

............या  प्रश्नाचे मौन  हेच  ऊत्तर  असते.........   निशब्द ......कारण  जे  राहीलं  ते  आता  परत  येणार  नव्हते. .....

                          ●●●

"आपल  काही  मागे राहीलं तर नाही ना  ? "

स्मशानातून  बाहेर  पडताना  भटजींनी  त्याला  विचारले.

"नाही "   अस  सांगताच  ते  पूढे निघून  गेले.

त्याला  मात्र  मागे  पहाताना  दिसली  आईची  धडाडणारी चिता. ..........

...."नाही  कस  ? सगळच तर  राहीलयं  मागे. "

आणि  तो  आवेगाने  मागे  फिरला,  सरणार जवळ   पडलेली  चिमूटभर  राख  त्याने  हातात  घेतली. ...

त्याला  मागे  फिरलेला पाहून  एका ने विचारले
, "
काही राहीलं होत का मागे  ? "

भरल्या  डोळ्यांनी  तो  म्हणाला

" नाही,  काही ,-काही  राहील  नाही  मागे  "

"आणि  जे  राहीलं  आहे  ते  आता  कधी. . कधीच  परत येणार नाही ".......काही  उरलच नाही  , सोबत  घेण्यासारखे...........

.....

Monday, 29 February 2016

"ब्रेक तो बनता है "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹 
.            योगेश जोशी
.           वज्रेश्वरी / ठाणे

      " ब्रेक  तो  बनता  है  "

विकेंड  ला  गावी वज्रेश्वरी  ला  निघालो  होतो.
  अहमदाबाद  हायवेवर  ही तूरळक  वाहतूक  वर्दळ  होती  त्यामुळे  मी गाडी  सूसाट  दामटवित होतो .

मागील  सीट  वर  ऋचा  व  वीणा  ची  दंगा  मस्ती  सूरू  होती.

अचानकपणे  समोर  एक  बाईकस्वार   स्लीप  झाला  आणि  मी  तातडीने ब्रेक  दाबून  गाडी  थांबवली. .
.........हूश्श. ........वाचलो. .

मागे  बेसावधपणे  बसलेल्या  मूली  अचानकपणे  पूढे  आपटल्या........

" काय  हे  बाबा"  ?                 "कसा ब्रेक  लावता  हो " ?
पडले ना मी .....  मोठी कन्या " ऋचा "  वैतागून  म्हणाली

वेडा  आहे . बाबा  नूसता  ......   नीट  चालव  ना  गाडी. ...लागलं  मला डोक्याला ..   ...अस .काय  करतोस.??? .....  आमचं   लहान पिल्लू  "वीणा " रागावून  म्हणाली .

"साॅरी हं ,  अग  ब्रेक  नसता लावला तर  अपघात  झाला  असता
....गाडी जागेवर  थांबली  म्हणून  नशीब  ! .".....मी उसासा  टाकून  म्हणालो.

"बर  झालं  बाबा ब्रेक  बनवतात  सर्व  गाड्यांना  थांबवायला  " .. ... आमची छोटी वीणा म्हणाली

"अग  ब्रेक  आहेत  म्हणून  नाही  तर  गाडी थांबविण्यासाठीच  ब्रेक  दिलेले  असतात. "....मी  समजवून  दिले.

"नाही बाबा , मला नाही पटलं तूमचं."
'ब्रेक ' चा  ऊपयोग फक्त  गाडी  थांबविणे नसून  आणखी  काही  वेगळे  महत्वाचे कारण आहे  त्या  पाठी ."....  ऋचा मला म्हणाली

छे! !  काहीतरीच  काय ?
या  पेक्षा  दूसरे  कारण  नाही ... ब्रेक चा  उपयोग  गाडी  थांबवणे  ईतकच. ......मी  ऋचा  ला  समजावू  लागलो.

पण  तीने  तिचा  हेका  कायम  ठेवत  म्हणाली,

" बाबा  विचार  करून  सांगा  बर,  आणखी  काय  महत्वाचे  कारण  असेल  गाडीला ब्रेक  लावण्यापाठी.?"

"डोक  नको  खाऊस , दूसर  काहीही  कारण  नाही....नीट  बसून  घ्या  आणि  हो आता मस्ती  नको. ......माझा आवाज  थोडा  चिडचिडा

ऋचा मात्र ईरेला पेटली....

  ," आणि मी जर  दूसर  कारण  सांगितल  तर  आईसक्रीम  द्याल. ...

Done  !!  दिले  समज  , पण  मला तू  दिलेले  कारण  पटायला हवे    ! फालतू  'पीजे ' नाही चालणार. .हो .". चल  बोल  पटकन". ...ऊत्सूकता  वाढल्याने  मी  म्हणालो

"बाबा 'गाडीला  ब्रेक  आहेत  म्हणून  आपण  गाडी  थांबवू  शकतो , हे जरी खरं  असलं  तरी,  ब्रेक  आहेत  म्हणूनच   तर आपण  गाडी वेगाने  चालवू  शकतो ...... .

जेव्हा  माझ्या  साईकल  चे ब्रेक  नीट  लागत  नाहीत  मी  वेगाने नाही  चालवू  शकत  या ऊलट जेव्हा  तूम्ही  ब्रेक  दूरूस्त  करून  आणता  तेव्हा  मी  मस्त  वेगात  साईकल  चालवू  शकते. ....
.
म्हणजेच  ब्रेक  हे  वाहन  वेगाने  चालविण्यासाठी असतात  की  नाही  "

आता आपल्या  गाडीला  ब्रेक  नसते तर  तूम्ही  ती  चालवू शकाल  का  ?
आतल्या  आरशात  तिचा चेहरा  माझा  हरण्यातही फूललेला  चेहरा  टिपत  होता.

मंडळी  आयूष्याच्या  प्रवासाचेही अगदी असेच  आहे.

या  प्रवासात  अनेक  संकट  , अडथळे,  कठीण  काळ, अपयश , निराशा   असे  ब्रेक  लागत  असतात."
.......आपल्याला  वाटत  हे  सारं  माझा प्रवास  थांबविण्यासाठीच  आहे. ......

पण  मित्रांनो  हे  असे  ब्रेक  असतात  ते  तूम्ही  , नवीन  जोमाने  ऊर्जेने , भरदाव वेगाने  तूमच्या  लक्षापर्यत जावे म्हणूनच...
  काय  वाटतं  तूम्हाला. ....

ईतक्यात पूढे  चालणार्या एका  ट्रक  च्या  मागे  लिहीलेल्या  ओळी  दिसल्या  .......
ईतर  वेळी ट्रक  पाठीमागे लिहीलेल्या  निरर्थक  ओळींचा  आज  निराळा  अर्थ  समजत  होता.

.......नजर  को बदलो
.......नजारे  बदल  जाएंगे  ।
........सोच  को  बदलो
......  सितारे  बदल  जाएंगे  ।

"चला ऊतरा ,  आईसक्रीम  पार्लर  आलं  आणि  एक सोडून  दोन  घ्या  खूशाल ",  ..... मी  गाडी  थांबवत  म्हणालो

व्वा  ...Love  you  बाबा   ...एकदम  दोन दोन  आईसक्रीम  .....दोघीही एकसूरात ओरडल्या. .........

बायको  डोळे मोठ्ठे  करून   म्हणाली
, " अरे टाईमपास  होईल, ऊशीर  होईल  जायला  आपल्याला   ."

"अग  ईतका  लाॅग ड्राईव्ह  आहे  ,
या  प्रवासात  " एक ब्रेक  तो  बनता  है  ।   मी हसत  म्हणालो .

Let's  enjoy. .......

माझी लेखनयात्रा  🌈
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

Friday, 26 February 2016

" हरवले आहेत "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

           .    योगेश जोशी
.             वज्रेश्वरी / ठाणे

        " हरवले  आहेत "

वर्तमान पत्रात ' हरवले आहेत ' या सदरातील  बातमी वाचली  आणि
प्रश्न  पडला
"ऐन  उमेदीत  माणसं  अशी हरवतात  कशी  ?"

TV  वरील  "आपण  यांना  पाहिलंत का  ? " या  कार्यक्रमाची  आठवण  झाली .

हरवलेल्या माणसाबद्दल   आपल्याला  सहानुभूती  वाटते  पण  माणसे सापडलेली  समजत  नाहीत.
कारण ' हरवणे ' ही बातमी होते.. सर्वाना  कळणे  गरजेचे..
पण ' सापडणे ' नाही  कळले ..
तरी  चालते. ती  बातमी  होत  नाही

भीमाशंकर  ट्रेक  करत  असताना मी वाट  चूकलो. *  ( पून्हा  तेच...  चूकलो  मी  पण  वाटेवर  ढकलून  द्यायचे...  चूकली  म्हणुन )

एका गूराख्याला म्हटल ....

" मी हरवलोय  "

तो  हसला

"हसायला काय  झाले  ?"... मी

"आलात  कूठून ?" ....त्याचा  प्रश्न

"कर्जत  , खांडस हून.".. .माझे ऊत्तर


"कूठे  निघालात ?"......पून्हा  प्रश्न

"भीमाशंकर ".....माझे ऊत्तर

"आता कूठं आहात "?... त्याचा प्रतिप्रश्न

"गणेश  घाटा  च्या जवळपास  असेन " .............. अंदाज  घेत  ऊत्तरलो.

हसण्याचे  कारण  सांगत  तो  म्हणाला,

" कोठून  आलात? , कोठे  आहात ?,  व कोठे जायचे  आहे  ?" हे जर  तूम्हाला  माहीत  आहे ....तर.........

तर..  तूम्ही ' हरवलेले ' नाहीत  तर  'भरकटलेले ' आहात,  ..

तूम्हाला  मार्गदर्शना  ची गरज  आहे. "
हे ऊत्तर  खूप  काही देवून  गेले

हरवलेल्या  माणसांना  त्यांच्या  लहानशा  'आकाशात ' योग्य  ते  मार्गदर्शन  न  मिळाल्याने  ती  जमिनीवर  हरवतात. .....

तर  काही  माणसं  स्वतःला  हरवून  घेतात..........  ओळखी  च्या  माणसातून अनोळखी  माणसामध्ये  जातात........................... .   आपला जीवाभावाचा माणूस  शोधायला.

मग  अशा हरवलेल्या  माणसांचा  फोटो  दिला जातो,.....  फक्तं  फोटोच  देता  येतो ........... त्या शिवाय  त्यांच्यापाशी  काय  असणार,

तो  फक्त 'दिसतो  'कसा ,?
हेच ठाऊक  असत  त्यांना

त्याच  मन  कसं  आहे ?.. कूठे  आहे ?....

हे नसत  समजलेले  त्यांना.

...म्हणून तर  हरवतो  तो.............
" मन " समजल  असत  त्याच  तर  तो  हरवला  नसता. ...

तर  काही  माणसं  घरातच  हरवतात  ....माणूस  घरात  दिसतो.......   दिसत राहतो ....पण  सापडत  नाही. ....

'जनात  राहूनही  विजनवासाचा  अनूभव  प्रत्येकाला कधी  न  कधी  येतोच. '

अशा वेळी माणूस  सापडण्यासाठी  "वर्तमानपत्राची" नाही तर  "वर्तमान  प्रेमाची " गरज  असते. .....

.कारण  आभाळ  हरवलेल्या  माणसांना  ..आता  काळ्या  डोहाच्या  खोलीची ,....  धडधडणार्या   रेल्वेची ,   अंधार्या दरीच्या  खोलीची  .....किंवा किटकनाशकाचा  ऊग्रदर्पाची.. कशा..कशाची भीती  वाटत  नाही. ......

अशा माणसांकडे  सूख-दूखाला, संकटाना  सामोरे जाण्याचे  धैर्य  असलं......  तरी  व्यवहारी  जगाचा  "धूर्तपणा "अंगी  नसल्याने  साध  सहज  जगणे जीवघेणे  होते.

अशावेळी  त्याच्या   डोळ्यातील  आभाळ  आपल्या  डोळ्यात  द्यावे.

..विश्वासाचा  हात  पाठीवर  ठेवून  आपूलकीच्या , प्रेमाच्या  शब्दांचे  पूल  जोडले  की  माणस  हरवत  नाहीत. .......

मग कसली  वाट  बघताय.....अजून  ऊशीर  नाही   झालेला......
हरवू  नका आणि  हरवूनही  देवू  नका  !

'ईलाही 'अशांचे  वर्णन करताना म्हणतात .....

अंदाज आरशाचा  वाटे खरा असावा
बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

🌈  माझी लेखनयात्रा
          योगेश जोशी

आवडल्यास  शेअर करा